लेवा समाजात हार्दिक स्वागत


 लेवा समाजा बद्दल  थोडक्यात माहिती

प्रास्ताविक  :--

भारत हा अनेक विविधतेने नटलेला देश आहे . येथे अनेक संस्कृती पहावयास मिळतात या संस्कृती समाजांचे  अभिन्न अंग आहे. हे समाज वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने येथे नांदतांना दिसून येतात त्यापैकीच एक समाज जो इतरांसोबत समान चालत असला तरी आपली एक विशिष्ट सांस्कृतिक ओळख जतन करून आहे तो समाज प्रामुख्याने महाराष्ट्राच्या पूर्व खानदेश भागातच अधिक प्रमाणात दिसून येतो तो म्हणजे लेवा पाटीदार समाज होय.

       हा समाज सामाजिक दृष्ट्या अत्यंत लवचिक स्वरूपाचा असल्यामुळे हजारो वर्षापासून चालत असलेली सामाजिक स्थित्यांतरे सहज पचवू शकला आणि आपले विशिष्ट अस्तित्व टिकवू शकला . समाजातील स्त्री–पुरुष हे या सांस्कृतिक वारसाला पुढे नेण्यासाठी सदैव तत्पर असतात.

 


एका बाजूने पाहिल्यास हा समाज परंपरागत वाटतो पण दुसऱ्या बाजूने हा समाज तितकाच आधुनिक आहे. हा समाज परंपरा आणि आधुनिक समाज यांचा सुरेल संगम आहे. थोडक्यात लेवा पाटीदार समाज हा खानदेशी एकूण समाजाचे सांस्कृतिक प्रतिनिधित्व करतांना दिसून येतो.

लेवा पाटीदार व्युत्पत्ती :-  

       गुजराथी भाषेमध्ये ‘पाटीदार’ म्हणजे पाटील किंवा शेतकरी असा अर्थ होतो. ‘पट्ट’ म्हणजे फार मोठे शेत आणि ‘पट्टी’ म्हणजे शेतीचा लांब पट्टा व जो धारण करतो तो पाटीदार असा अर्थ निघतो.

      ब्रिटीश राजवटीपूर्वी प्रमुख पाटीदार शासन व कुलांमधील मध्यस्तीचे काम करीत आणि कौश्यल्याने सारा वसूल करून शासनास देत, त्यांना Revenue officer असेहि संबोधले जायचे.

     विद्वानांच्या मते गुजराथ मधील नर्मदा नदीस ‘रेवा’ असे म्हणतात व ‘रेवा’ वरून ‘लेवा’ असा अपभ्रंश झाला असावा.

      दुसरया मतप्रवाहानुसार रामाचे पुत्र लव व कुश हे होते. लावाच्या वंशजांना ‘लेवे’ किवा ‘लेवा’ व कुशाच्या  वंशजांना ‘कडवे’ असे म्हणतात.

स्थलांतर  :-

      इ.स. च्या ११ व्या  ते १५ व्या  शतकात गुजराथमधून लेवा पाटीदार समाजाने स्थलांतर सुरु केले पण इ.स. १४८४ मध्ये गुजरातचा सुभेदार महंमद बेगडा याने हिंदुंवर अनन्वित अत्याचार केल्यामुळे येथील लेवा पाटीदार समाजाने मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले.

      गुजराथमधून आलेल्या १४०० बैलगाड्यांचा शेवटचा मुक्काम अमळनेर तालुक्यातील (सध्या धरणगाव ) नांदेड या तापी काठच्या गावी होता. त्यानंतर तेथुन ७०० गाड्या तापीच्या उत्तरे कडून यावल, रावेर, बऱ्हाणपूरकडे गेल्या त्याला पारपट्टी व उर्वरित ७०० गाड्या तापीच्या दक्षिणेकडून जळगाव, भुसावळ,व मुक्ताईनगर गेल्या त्या भागास आरपट्टी असे म्हटले जाते.

पंथ :-

लेवापाटीदार समाजामध्ये एकूण चार पंथ आहेत.

(१)     वारकरी पंथ

(२)     महानुभाव पंथ

(३)     सत्पंथ किंवा पिराणा पंथ

(४)     स्वामीनारायण पंथ

भोरगाव पंचायत :-

भोरगाव लेवा पंचायत हि या सामाज्याची एक वैशिष्टपूर्ण सामाजिक न्यायव्यवस्था आहे .तिचे निणर्य लेवा पाटीदार लोक विनातक्रार पालन करतात हि न्यायव्यवस्था समाजातील सामंजस्य टिकवून ठेवण्यातअतिशय महत्त्वाचीभूमिका बजावते तिच्या माध्यमातून लग्नासबंधी संघर्ष, घटस्फोटासंबंधी वाद , वारसा हक्क इ. अनेक कार्य केले जातात.

         या पंचायतीचे कुटुंबनायक म्हणून श्री. रमेश विठू पाटील हे कार्य पाहतात.

सण-उत्सव :-

लेवा पाटीदार समाजामध्ये दिवाळी,दसरा,होळी,अक्षयतुतीया(आखाजी),नागपंचमी,संक्रांत इ. हे सण साजरे केले जातात व लौकिक उत्सवामध्ये कानबाई उत्सव (कानबाईचे रोट) व भुलाबाईउत्सव फार मोठ्या प्रमाणातसाजरे केले जातात.

लेवागणबोली :-

     लेवा गणबोलीहि फक्त पूर्व खानदेश या भागात लेवा पाटीदारलोकच अधिक प्रमाणात बोलतात हि बोली अधिक प्रसिद्ध करण्याचे कार्य सूर्यकन्या बहिणाबाई चौधरी,रुख्मिनीबाई पाटील यांनी केले. या बोलीभाषेतील साहित्य हे संख्यात्मकदृष्ट्या कमी असेल तरी ते अतिशय समृद्ध असे आहे त्यांचीन प्रचिती प्रा.डॉ. वि. भ कोलते, के.नारखेडे, प्रा.भानू चौधरी, सोपान चौधरी, प्रा.श.रा.राणे, प्रा.डॉ.भालचंद्र नेमाडे, प्रा.डॉ. प्रमिला भिरूड. इ आदिनी केले.

         सरांशपणे असे म्हणता येईल कि लेवा पाटीदार समाज हा १५ व्या शतकामध्ये पूर्व खानदेशत आल्यावर त्यांचा मुख्य व्यवसाय हा शेती होता. यात ते केळी,ऊस,गहू,ज्वारी,कापूस,पालेभाज्या इ.पिकांची लागवड करीत असत. पुढे ब्रिटीश काळामध्ये शिक्षण व इंग्रजी भाषेचा अंगीकार करून या समाजातील अनेक कुटुंबांनी शहराकडे धाव घेतली व त्यातूनच त्यांची फार मोठी प्रगती झाल्याचे दिसून येते.

      आज या समाजातील अनेक लोक उच्चविद्याविभूषित डॉक्टर्स ,इंजिनिअर्स , वकील, प्रोफेसर्स,शासकीय अधिकारी,व्यवसायीक,कला,क्रीडा आदी क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतल्याचे दिसून येते तसेच असंख्य कुटुंबे आज अमेरिका,युरोप,ऑस्ट्रेलिया,स्वित्झरलंड,सौदी अरेबिया, नेदरल्यांड इ. देशामध्ये विविध पदावर कार्यरत असल्याचे आढळून येते.

प्रा. प्रफुल्ल हरीश इंगोले.
भुसावळ कला,विज्ञान आणि पु.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालय,
भुसावळ, जि.जळगाव.
मो. नं. ९९२२५३२८८२